प्रवरेला साथ देऊन अशोक च्या प्रत्येक संकटावर मात करणारे पूर्व भागाचे जिगरबाज व्यक्तिमत्व ! *कै.सखाहरी भोसले पाटील !!*
लोणी कारखान्याच्या परवानगीसाठी अचानक मोठी रक्कम भरण्याचा सरकारचा तातडीचा आदेश तारेद्वारे आलेला असताना प्रवरेच्या हाकेला ओ देणारे सखाहारी पाटील !
कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या महामानवाची शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची तळमळ पाहून, त्यांच्या एका शब्दावर हसत नोटांचे बंडल सुपूर्द करणारे दिलेर सखाहारी भोसले पाटील!
कडबा प्रश्न सोडविण्यासाठी मोगलाई काळात ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारून नदीतून नावेद्वारे कडबा आणणारे लढवय्ये सखाहारी भोसले पाटील !
इंजिनिअर्सची नेमणूक करून त्या काळी आधुनिक तंत्रज्ञान वापरून दर्जेदार गुळाचे उत्पादन करून एडन सारख्या देशात गुळ निर्यात करणारे आणि कारखाना अडचणीत असताना पेमेंटला पैसा पुरवणारे सखाहारी भोसले पाटील !
पूर्व भागावर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून भूतकाळात तुमच्या माझ्या पूर्वजावर निस्वार्थीपणे उपकार केलेले साखाहारी भोसले पाटील !
यांच्या कर्तुत्वाची आणि दिलेरपणा ची ओळख या तिसऱ्या पिढीला करून देणे ही त्यांना पुण्यतिथी च्या निमित्त वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल !!
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाची उत्पत्ती इंग्रजांच्या बेलापूर शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीसाठी अर्थात हरेगांव कारखान्यासाठी झालेली असली तरी भंडारदरा धरणामुळेच हा भाग अगदी सुजलाम सुफलाम झाला आहे. मुबलक पाण्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आणि ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक असणारे राज्य जसे महाराष्ट्र, तसे महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचा नगर जिल्हा आणि त्यातही आपला उत्तर भाग म्हणजे देशात सर्वात जास्त
ऊस निर्माण करणारा उत्तर नगर जिल्हा एकेकाळी होता हे आपल्याला अभिमान बाळगण्यासारखे आहे !
परंतु हे ऊसाचे क्षेत्र वाढविण्याचे श्रेय जसे भंडारदरा धरणाला जाते तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा थोडेसे जास्त श्रेय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या महान मानवाला जाते हे कोणीही नाकारू शकणार नाही !
कारण त्यांच्या पासून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन नंतर कित्येक कारखाने निघाले. काळाच्या ओघात बंद ही पडले; अशोक आणि प्रवरा सुरू आहेत हे भाग्यच मानून चालू या !
कै. विठ्ठलराव विखे पाटलांनी धनंजय गाडगीळ यांसारखी ज्ञानी मंडळी आणि धडाडीचे मित्र बरोबर घेऊन पाहिलेले सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न पूर्ण करताना त्यांना किती हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या, कष्ट सहन करावे लागले, याची कल्पना आजच्या सहकारातील मंडळींना सहजासहजी येणार नाही. त्या युद्धात लढा देणारे ते शिलेदार आता दिवंगत झाले आहेत. तरी निव्वळ प्रवरेचा इतिहास बघावायचा असेल तर महान साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेली *लढत* ही कादंबरी वाचावायास हवी. त्या लढत कादंबरीमध्ये सखाहरी पाटलांकडे विठ्ठलराव विखे पाटील सारंगी ( टांगा) मध्ये बसून कसे भर उन्हात गेले, तिथे ग्लासभर दूध पाजून त्यांचा शब्द खाली न पडू देता भोसले पाटलांनी एवढी मोठी रक्कम देऊन त्यांना कसे हसत रवाना केले, याचा प्रसंग लढत मध्ये पान नंबर १०२ व १८१ वर स्पष्टपणे चित्रित केलेला आहे. सकाळी पाटलांची ती जिगर तो दिलेरपणा आणि शेतकरी बांधवांसाठी चा कळवळा या प्रसंगात प्रकर्षाने जाणवतो
*उंबरगाव चा सखाहारी पाटील भोसले हाही हाकेला ओ देणारा असा फाकडा गडी होता*
या एकाच वाक्यात साखाहरी पाटील भोसलें या दिलदार परोपकारी व्यक्तिमत्वाचा अंदाज आपल्याला येतो. त्यांनी प्रवरेच्या उभारणीत मूळ स्थापनेच्या कामी लावलेला हाच हातभारामुळे पुढे त्यांचे प्रवरेच्या म्हणजे विठ्ठलराव विखे आणि धनंजय गाडगीळ यांच्या सारख्या अनुभवी आणि थोर विभूती शी खूपच जवळकी चे संबंध आले. मग त्यांच्या मदतीने अशोक कारखाना स्थापना करण्यासाठी संबंध कारणीभूत ठरले हेच इतिहासात स्पष्टपणे दिसते!
*पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी सखाहारी भोसले पाटलांचा लढा !!*
भरपूर पाण्यामुळे तयार झालेला पूर्व भागातील प्रचंड प्रमाणातला संपूर्ण ऊस घेण्याची, त्याचे गाळप करण्याची क्षमता त्या वेळेच्या हरेगांव आणि टिळकनगर या कारखान्यांची मुळीच नव्हती. त्यामुळे 'या उर्वरित हजारो टन ऊसाचे करायचे काय?' हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे दरवर्षी आ व्वासून पूर्व भागापुढे उभा राहायचा. त्यासाठी पूर्व भागातील काही शेतकऱ्यांनी प्रत्येकी एकेक आधनाचे गुऱ्हाळ सुरू करून जमेल तेवढ्या ऊसाचा उपयोग करण्याचा प्रयत्न उत्पन्ना साठी सुरू केला. परंतु त्यात तंत्रज्ञानाचा समावेश नसल्याने पाहिजे तशी रिकवरी होत नसे. सखाहारी पाटलांनी याचा विचार करून हिमतीने मोठे पाऊल उचलले ! आपला आणि आपल्या सहकारी शेतकऱ्यांचा ऊस जास्तीत जास्त वापरून सर्वांना दोन पैसे मिळण्यासाठी त्यांनी थेट सात आधनाचे प्रचंड मोठे गुराळ इंजिनियर्सच्या अधिपत्याखाली सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, रंग वगैरे वापरून मोठे गुऱ्हाळ तयार केले व ते सुरू ही केले.याचा खूप मोठा फायदा पूर्व भागातील शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या कुटुंबाला एक आधारच तयार झाला. तो प्रक्रिया केलेला उच्च प्रतीचा गुळ साखाहारी पाटलांनी त्या काळामध्ये" एडन" सारख्या देशात मोठ्या प्रमाणात निर्यात करून,१८ / १८ महिन्यांनी पेमेंट घेतले. आणि या उद्योगापासून प्रवरेसारख्या कारखान्याची पूर्व भागाला असणारी गरज ही त्यांच्या मनात मूळ धरू लागली !
पुढे बहुतेक क्षेत्र ऊसासाठी असल्यामुळे कडबा समस्या भेडसावू लागली. त्याकाळी मोगलाईचे राज्य होते. प्रवरासंगम चा पूल नव्हता. नदीच्या पलीकडे मोघलांचा कायदा चाले. त्या भागात येणे जाणेही तेव्हा दुरापास्त होते. सखाहारी पाटलांनी कडबा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी लढा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची मदत व मार्गदर्शन घेऊन पूर्व भागातील तत्कालीन तालेवार शेतकरी, भाऊ रामराव बोर्ड, भिमाजी भागाजी पवार, त्रिंबक पाटील केकान,कारेगांव चे पटारे, मातापुरचे उंडे, भेर्डापूरचे कवडे,अशा लढाऊ वाघांची एक फलटणच तयार केली; आणि मोगला विरुद्ध हिमतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी दंड थोपटून या सगळ्या धुरंदरांची मदत घेऊन नदीच्या मार्गाने नावामधून कडबा आणण्याचे धाडस या सर्वांनी केले. पूर्वभागातीलच नव्हे तर सर्वच शेतकऱ्यांना जर्जर करणारा कडबा प्रश्न सोडवला. पुढे या शेतकरी नेत्यांना ब्रिटिशांनी नगरला बंदीवानही केले. त्यातूनही सखाहरी पाटलांनी वरिष्ठांचा सल्ला घेऊन परांजपे वकिलांच्या सहाय्याने स्वतःची व सहकारी शेतकरी मित्रांची सुटका करून घेतली. याचाही उल्लेख *लढत* मध्ये आलेला आहे.
*अशोक ची स्थापना!*
पूर्व भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि साखर कारखाना निर्मिती च्या स्वप्नाची पूर्तता होण्यासाठी भागातील धुरंधर शेतकऱ्यांना एकत्र येण्यासाठी हक्काचे ठिकाण व्हावे, त्यातच मंदीच्या काळात लोकांना पोटपाण्यासाठी चार पैसे मिळावेत, असा दूरदर्शीपणाचा विचार करून सखाहरी पाटलांनी श्रीरामपूर मध्ये १९३० साली श्रीरामपूर शहरात इमारत बांधली. तिथे त्याकाळी त्यांनी आडत दुकान चालू केले.त्यामुळे सहकारी शेतकरी मित्रांचा संपर्क खूपच दांडगा झाला. आणि त्याच्या चर्चेतून योग्य परिणाम होऊन त्याचे फल स्वरूप म्हणून बेलापूर परिषदेची स्थापना त्याकाळी झाली. बेलापूर परिषदेतील आपापसातील बैठका आणि चर्चेतून अशोक कारखान्याची बीजे पेरली गेली. परंतु कारखाना निर्मिती ही सहकारातूनच झाली पाहिजे असा सखाहारी पाटलांचा अट्टाहास होता. परिषदेतील सभासद आणि येणाऱ्या मान्यवर शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चा या माळीनगर पर्यंत पोहोचल्या आणि येथील काही सल्लागारांच्या मदतीने किंवा माहितीने पुढे माळीनगर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचप्रमाणे कारेगांव शुगर हा सहकार तत्वावर कसा सुरू करायचा किंवा चालवायचा याचा एक अलिखित मसुदाच तयार झाला.
स्वतः सत्तेमध्ये सहभागी न होता पाहिजे ती मदत करून पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणाचे पाहिलेले स्वप्न कसे पुरे होईल, कारखान्याची स्थापना ही सहकारी तत्त्वावर कशी होईल, याचा विचार सकाहारी पाटील रात्रंदिवस करत होते. आणि हा कारखान्याचा मोठा उद्योग पुढेही सुरळीत चालावा यासाठी शिक्षित अर्थतज्ञ माणूसच कारभारी असावा, असा त्यांचा अगदी ठाम विचार होता.
त्यासाठी त्यांनी अगदी योग्य आणि पात्रतेचा माणूस म्हणून धनंजय गाडगीळ यांनाच गळ घातली परंतु तज्ञ आणि अर्थ नीतीज्ञ असणारे गाडगीळ साहेब त्यावेळी देशाच्या पंचवार्षिक योजनेच्या कामात गुंतल्याने त्यांना उसंतच नव्हती. आणि त्यामुळे अशोक निर्मितीच्या पहिल्या बॉडीत सकाहरी पाटील स्वतः नसले तरी आर जी काकडे यांच्या हाती कारखान्याची धुरा सोपवून त्यावेळी सर्वात जास्त शिकलेले निवृत्ती बनकर यांची कारेगांव शुगरच्या म्हणजे आजच्या अशोक कारखान्याच्या चेअरमन पदावर निवड करण्यात आली. . कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील हेही अशोक कारखान्याच्या दुसऱ्या बॉडीमध्ये संचालक म्हणून होते. धनंजय गाडगीळ सल्लागार म्हणून होते. त्यावेळी भोसले पाटलांचा ८० एकर ऊस म्हणजे सुमारे ४००० टन ऊस असायचा. यावरून सखाहारी भोसले पाटलांची त्यावेळची असामी काय असेल याची कल्पना यावी. जास्तीत जास्त शिस्तीच्या शिक्षित मंडळींचा भरणा असावा, कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि सुरळीत चालावा असा सकाळी पाटलांचा प्रामाणिक हेतू असायचा. डॉक्टर आगाशे सारखी मंडळी ही संचालक मंडळात समाविष्ट केलेली असायची. नंतर ते व्हाईस पदावरही होते. अशा प्रकारे दिनांक १ डिसेंबर १९५७ रोजी अशोक कारखाना अर्थात कारेगांव शुगर या सहकारी कारखान्याची स्थापना झाली. अशोकची स्थापना आणि विकास यामध्ये सखाहरी भोसले पाटलांचे श्रेय किती मोलाचे याची कल्पना प्रत्येक प्रसंगात येते. कितीतरी वेळा त्याकाळी अशोक कारखान्याच्या पेमेंट साठी पैसेही त्यांनी स्वतः पुरविले आहेत. पुढे पाण्याची सुबत्ता असल्याने त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीचे लेव्हलिंग करण्याचा प्रश्न आला; तेव्हा सखाहरी पाटील भोसलेंनी तब्बल सात चेन ट्रॅक्टर मागवून लेवलिंगची मोहीम सर्वत्र राबवली व फत्ते केली.
असा प्रत्येक संकटाला आणि अडचणीला आव्हान देण्याचा लढाऊ बाणा असणारे सकाहारी भोसले पाटील यांची आज पुण्यतिथी!
त्या निमित्ताने हे अगदी थोडक्यात चार शब्द...
पुढे यथायोग्य त्यांचा संपूर्ण जीवन परिचय या तिसऱ्या पिढीच्या माहितीसाठी लवकरच एका पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत !
*शब्दांकन* : राजेन्द्र नारायणे
*संकलन :* अक्षय आगे
*प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق