दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भारतभरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व कृतज्ञतेच्या भावनेने साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि खरेखुरे शिक्षणप्रेमी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. म्हणूनच हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आला आहे.
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः” असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. यातून शिक्षकांचे स्थान किती उंच आहे हे स्पष्ट होते.
शिक्षक हे केवळ धडे शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवणारे शिल्पकार असतात.
आई-वडील जसे जीवन देतात, तसेच शिक्षक ज्ञान, संस्कार आणि दिशा देतात.
त्यांच्या मार्गदर्शनामुळेच समाजात विद्वान, शास्त्रज्ञ, कलाकार, साहित्यिक, नेते व समाजसेवक निर्माण होतात.
या दिवसाचा उद्देश केवळ औपचारिक सन्मान नसून शिक्षकांप्रती असलेल्या कृतज्ञतेची जाणीव समाजापुढे आणणे हा आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, नाटिका आणि शिक्षक सन्मान सोहळ्यांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करतात.
आधुनिक युग हे विज्ञान- तंत्रज्ञानाने समृद्ध झाले असले, तरीही शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. इंटरनेट व तंत्रज्ञानातून माहिती मिळू शकते; परंतु त्या माहितीचे ज्ञानात व संस्कारात रूपांतर शिक्षकच घडवतात. तेच विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य यातील फरक समजावून देतात.
या दिवशी प्रत्येकाने मनोमन विचार करणे आवश्यक आहे की आपण शिक्षकांच्या शिकवणीला किती न्याय देत आहोत. समाजात सुसंस्कारित व जबाबदार नागरिक घडवणे ही आपलीही जबाबदारी आहे.
“ज्ञानाचा दीप लावून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व मान्यवर शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले मार्गदर्शन हेच आमचे खरे धन आहे.” 🌹
*शौकत शेख*
संस्थापक / अध्यक्ष
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
إرسال تعليق