मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २०.८.२०२३
येथील शिक्षक, लेखक, कार्यकर्ता हेरंब कुलकर्णी यांनी आरएसएस भाजपासोबत गेलेल्या पक्षाच्या छगन भुजबळांना काही जाहीर सवाल केलेले आहेत. सामाजिक चळवळीतील या महत्वाच्या प्रश्नांची पुरोगामी कार्यकर्त्यांना उत्तरे देण्याची राज्यातील तरूणाईची अपेक्षा आहे. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मनातील हे प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी विचारलेले आहेत. त्याची उत्तरे भुजबळ यांनी देणे अपेक्षित आहे.
माननीय,
ना. छगन भुजबळ ,
सरस्वती शारदा देवी यांनी किती शाळा काढल्या ? माझे दैवत सावित्रीबाईंच असे अतिशय टोकदार उद्गार आपण काढले याबद्दल तुमचे मनापासून कौतुक वाटले. पण हे बोलणे केवळ भाजपसोबत जाऊन जी पुरोगामी प्रतिमा डागाळली ती सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटतो..जर तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर पुढील प्रश्न मला पडतात
१) सावित्रीबाई फुले जर दैवत असेल तर पंतप्रधान दगडुशेठ हलवाई गणपती दर्शनाला आले पण समोरच्या भिडेवाड्यात गेले नाहीत. याबद्दल जाहीर अपेक्षा किंवा नाराजी तुम्ही का व्यक्त केली नाही ?
२) संघ परिवाराच्या सर्व शाळांमध्ये सरस्वती वंदना म्हटली जाते. त्यावर काही आक्षेप घेणार आहात का ? तिथे सावित्रीबाई जयंती साजरी करण्याचा आग्रह धरला तरच या बोलण्याला अर्थ राहील.
३) सावित्रीबाई हे केवळ प्रतिक नाहीतर वंचित वर्गातील मुलींच्या शिक्षणाचा आणि संविधानातल्या मूल्यांचा विचार आहे. NCERT ने पाठ्यपुस्तक बदल करून वैज्ञानिक दृष्टिकोन पातळ केला आहे. त्यातून स्त्रीदास्य वाढत जाईल. याविषयी काही बोलणार का ?
४) महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षकदिन व्हावा, अशी खूप वर्षांची मागणी आहे. ही मागणी केवळ दिवस बदलण्यापुरती नाही तर तो दृष्टिकोन शिक्षणात स्वीकारण्याची आहे. त्यासाठी सरकारमध्ये आक्रमक भूमिका घेणार आहात का ?
तरच तुमच्या या आक्रमक वाक्यात अर्थ उरेल अन्यथा ते केवळ प्रतिमा सफेती उरेल, अशी जाहीर अपेक्षा शिक्षक, लेखक, कार्यकर्ता हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील पुरोगामी कार्यकर्ते छगन भुजबळ यांनी या महत्वाच्या सामाजिक चळवळीतील प्रश्नांची उत्तरे देण्याची वाट पहात आहेत.
Post a Comment